भेट

—-१—-

अचानक कोणीतरी हाक मारल्याचा आभास झाला. तिने गर्रकन वळून पाहिले. भिरभिरत्या नजरेने तिने गर्दीतील चेहरे न्याहाळले. पण सारेच अनोळखी. भासच झाला असावा असे म्हणत ती परत लगबगीने चालू लागली… पण काही पावले पुढे गेल्यावर पुन्हा तेच. ह्यावेळी हाक मोठी होती. ती त्रासलेल्या नजरेने परत वळून पाहू लागली. तितक्यात तो आला… धापा टाकत. “काय ग! एक सेकंद मागे वळून पहायला पण वेळ नाही का!” त्याने थोडं लाडातच विचारलं… जणू ती त्याची लहानपणापासूनची मैत्रीण असावी.
“मी ओळखलं नाही तुम्हाला… अं?” ती भलतीच गोंधळली होती.
“तुम्हाला?? अरे बापरे! म्हणजे खरच नाही ओळखलस! अगं! मी! चिंटू! रोहित गं!”
“चिंटू???” ती त्याला विस्फारलेल्या डोळ्यांनी पहात होती. खरच किती बदलला होता तो. बारिकसा , गोरा घारा चिंटू आता बराच फ़ुगला आणि रापला होता. त्याचे डोळे विसरणे शक्यच नव्हते. तोच होता. ती तोंडावर दोन्ही हात ठेवून हसत होती… तो ही हसू लागला… दोघे पुर्वीसारखे टाळ्या देत हसू लागले.
“चल coffee पिऊया” तो म्हणाला.
“अरे! आत्ता नाही रे! मला काम आहे महत्त्वाचं! number दे तुझा. मला तुझ्याशी खूप म्हणजे खूप बोलायचे आहे! आपण आरामात भेटून बोलू” ती पर्स मधून मोबाईल काढत म्हणाली.
“बरं! ” म्हणत त्याने निमूटपणे number दिला. “चल! भेटू!” मोठ्ठे स्मितहास्य देते ती गर्दीत पुन्हा नाहीशी झाली… आणि तो तिला पहिला मेसेज टाइप करू लागला…
“अजुनही तशीच हसतेस तू! 🙂 आता तार नाही दातावर तरी कशाला हात ठेवतेस तोंडावर हसताना!”
ती बस मधे चढली. मेसेज पाहिला. “तुला पाहून पुन्हा पुर्वीची तारवाली झाले रे! 😛 खरच आता मी बत्तीशी दाखवत हसते.”
आणि बसमधुन उतरे पर्यंत पुर्ण एक तास ते मेसेज करत होते. तशीच एकमेकांची टिंगलटवाळी.. तसेच फालतू विनोद… जसं की कालपरवा नंतर आज पुन्हा भेटलेत…पण खरं तर पंधरा.. नाही ..सोळा वर्षांनी ते पुन्हा भेटले.
“कधी भेटतेस?” त्याने मेसेज केला… पण तिचा रिप्लाय नाही आला बराच वेळ. महत्त्वाच्या कामात अडकली समजून त्याने जास्तं वाट नाही पाहिली… पण तो वाट बघत होता.. त्याच्या स्वत:च्याच नकळत…

—-२—-

बारावीचा शेवटचा पेपर. त्याचे मन वेगळयाच विचारात गुंतले होते…प्रश्नांची उत्तरं जणू आपोआप दुसरेच कुणीतरी लिहित होते. ती बाजूच्या रांगेत दोन बाकं पुढे बसली होती. मधेच तो तिला पहात होता… ती आपली मुंगीप्रमाणे स्वत:तच गुंग होऊन लिहित होती. तो थोडा वेळ तिला निरखून परत लिहित होता… पण आता तेही जमेनासे झाले होते. त्याने वैतागून शेवटची दहा मिनिटे उरलेली असताना पेपर परिक्षकांना देऊन टाकला आणि पळत पळत कट्ट्यावर पोहोचला. बाकीचे पंटर आधीच आले होते. त्याला पाहून सगळे हसू लागले.
“काय रे scholor!! आज चक्क १० मिनिटं आधी??! ठीक आहेस ना?”
“नाही. काय लिहिलं तेही आठवत नाही. सोड ना! पास होइन. सुट्टा दे”
“तु पास नाही झालास तर कोणीच नाही होणार दोस्ता ” म्हणत त्याला एकाने cigarette दिली. तो पुन्हा विचारांमध्ये बुडून गेला. दुरून पेपर संपल्याची घंटी ऐकू आली. आणि अचानक त्याला जाणवले की त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते. त्याने पटापट cigarette फुकुन विझवली आणि तिच्या येण्याची वाट पाहू लागला. बाहेर पडणार्‍यांची गर्दी वाढली होती. नेहेमीचे चेहेरे अधुन मधुन दिसत होते.. काही नेहेमीचे पेपर कसा गेला वगैरे प्रश्न विचारून चालू पडले. ती मात्र दिसेना. तरी तो गेटपाशीच उभा राहिला तिची वाट पहात… शेवटी ती दिसली. त्याच्या छातीत धस्स झालं. इतका वेळ ज्याचा विचार केला होता ते बोलायची वेळ आली होती. आणि अचानक त्याला दातखीळ बसल्यागत वाटू लागले. ती समोर आली आणि नेहेमीप्रमाणे स्मितहास्य दिले.
“काय रे? लवकर निघालास आज? कसा गेला पेपर?”
“बरा”
“हं! मला तर काहीच येत नव्हतं! शी.. माहित नाही काय होणार ते… तु Q2b चं काय लिहिलंस answer?”
तो काहिसा रोबोटप्रमाणे उत्तर दिल्यासारखा बरळला. त्याला स्वत:चा आणि तिचा, दोघांचाही राग येत होता… ही काय मंद प्रश्न विचारतेय! काय फरक पडतो काहीही का असेना उत्तर! आणि मी का हिला बरोबर उत्तर सांगतोय! मला जे बोलायचे आहे ते कधी बोलणार!!
“ओये! काय झालं? इतका का त्रासला आहेस? बोल ना!”
“मला काही सांगायचय महत्त्वाचं. चल.. चालता चालता सांगतो”
ती प्रश्नार्थक नजरेने त्याला पहात होती… तिला काहीच पत्ता नव्हता त्याला काय सांगायचे आहे त्याबद्दल. तीने तेवढ्यातल्या तेवढ्यात थोडे तर्क बांधून घेतेले.. त्याने एक मोठ्ठा उसासा सोडला आणि बडबडु लागला…
“आम्ही दिल्लीला shift होतोय. बाबांची बदली झाली आहे. ते परिक्षा संपेपर्यंत थांबू म्हणाले होते. जावं तर लागणारच. मी एकटा इथे राहिन म्हणालो तर आई रडू वगैरे लागली. मग काय बोलणार पुढे! हे सगळं अनपेक्षित आहे.. मलाही त्यांनी फार उशीरा सांगितलं. मी तुला नाही सांगितलं परिक्षा जवळ आली होती म्हणून. माहित नाही तू कशी react होशील… तू ऐकतेयस ना?!”
ऐकता ऐकता तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. गेली कित्येक वर्षे उठता बसता, खाताना, अभ्यास, assignments करताना, येता जाताना प्रत्येक क्षणी ते सोबत होते… कधी चुकुनही दुर होण्याचा विचार आला नाही मनात. त्याचं सोबत असणं तिने गृहीतच धरलं होतं. तिला अचानक एकटं पडल्यासारखं वाटू लागलं. तो गेल्यावर काय होणार? तिचा कुठला group ही नव्हता मित्रमैत्रीणींचा. गरजच नाही पडली नवीन मित्र-मैत्रीण बनवायची..
इतक्या वर्षांचा काळ एका क्षणात डोळ्यांसमोरुन गेला.. तिने नकळत त्याचा हात घट्ट पकडला… जे ती बोलू शकत नव्हती ते तिचा स्पर्श सांगून गेला… तोही मुकपणे तिचा हात पकडून चालत होता.. त्याला काहीच कळत नव्हते. आधी कधी कुठल्याही मित्राला अलविदा बोलताना हृदय इतके जड नव्हते झाले… आता का?
बस न पकडता दोघे चालत राहिले.  चालता चालता तिच्या घरापाशी पोहोचले.
“कधी जाणार?” तिने घसा खाकरत विचारले.
“परवा”
“उद्या भेटशील?”
“बघतो… नक्की नाही माहित… थोडी कामं बाकी आहेत ती आटपावी लागतील उद्या. सांगतो मी”.
“हं. बरं.” तिच्या डोळ्यांतून धारा वाहू लागल्या होत्या.  तीने हात सोडवत त्याला “भेटू” म्हंटलं आणि आपलं नेहेमीचं तारवालं स्मितहास्य देत बिल्डींगचं गेट ढकलून आत गेली… ती पुन्हा पुन्हा वळून पहात होती त्याला…
तो खिळल्यागत तिथेच उभा होता… ती दिसेनाशी झाल्यावरही.

—-३—-

“अगं कीती वाट पहायची? अर्धा तास झाला मला येऊन, परत संध्याकाळी बाहेर जायचं आहे यार मला!”
“बस दोन मिनीटं! रिक्षाला पैसे देऊन आले.”
CCD मध्ये माया कृतिकाची वाट बघत बसली होती. एक Cold coffee आणि sandwich पण संपवून झाले होते. अजुन काय मागवायचे ह्या विचारात असतानाच तिला कृतिका धापा टाकत येताना दिसली.
“पळत आलीस तू?” मायाने मिस्कीलपणे हसत विचारलं.
“मग काय! आजून ओरडा नव्ह्ता खायचा मला.” कृतिका काहीशी वैतागल्यासारखी बोलली.
“ओये! मी ओरडले नाही काय तुला. मला सवय आहे तुझी वाट बघायची. पहिल्यांदा उशीरा नाही येत आहेस तू!”
“हं. टोमणे नको आता. माझा मूड फारच खराब आहे”
“दिसतय ते. मी मस्करी केली तरी टोमणा वाटला तुला. Anyway. आधी काय पिणार ते सांग, मग आरामात बोलू.”
दोन Latte ची order देऊन दोघी गप्पा मारू लागल्या. गप्पा कसल्या… कृतिका एकटीच बोलत सुटली होती.
“रोहित भेटला होता काही दिवसांपूर्वी रस्त्यात. मी बाबांचा ब्लड रिपोर्ट घ्यायला जात होते क्लीनीकमध्ये. त्याला म्हणाले की आपण नंतर आरामात भेटून बोलू. Number घेतला त्याचा आणि काही मेसेजेस पण केले.  You know, we used to be best friends. पण आता सगळं बदललं आहे. आमचा गेल्या ५-१० वर्षांत फारसा संपर्क नाही. तो एक दिवस अचानक जातो म्हणून निघून गेला. त्यानंतर त्याचे call यायचे कधी कधी. दिल्ली किती happening आहे सांगायला. पण माझी life नव्हती happening. त्याला नाही दोष देत ह्यासाठी. पण मला त्रास व्हायचा ते ऐकून. हळू हळू त्याचे call कमी झाले. std करणं मला परवडत नव्हतं. काही वर्षांत अगदीच बोलणं बंद झालं. मला माहितही नव्हतं की तो  मुंबईमध्ये आहे. अचानक त्यादिवशी भेटला, I was genuinely happy. त्याने मेसेज केला “कधी भेटतेस?” म्हणून… मी reply नाही केला. ” Coffee चा एक घोट घेत तिने मायाकडे पाहीले.
“का? तुला नाही भेटायचं त्याला?” मायाने विचारले.
“तसं काही नाही. पण तेव्हा मला त्याचा थोडा राग आला होता.”
“कसला राग?”
“माहीत नाही…”
“अरे? राग आला आणि माहीत नाही का ते? teenager आहेस का तू!”
“मी पुढे सांगू का?”
“Yes!Please continue.”
“हं…. ह्यानंतर काही दिवस गेले. त्याचा काही पुन्हा मेसेजही नव्हता आला. गेल्या रविवारी आई बाबा पुन्हा नेहेमीप्रमाणे लग्न का करावे, मी कशी माझं आयुष्य खराब करून घेतेय ह्यावर लेक्चर घेत होते. मी निमूटपणे पोळ्या लाटत होते. तेवढ्यात बेल वाजली. रविवारी दादा, वहिनी आणि चिंटू जेवायला येतात दुपारी. त्या दिवशी थोडे लवकर आले. वहिनी आत येऊन मला मदत करू लागली आणि दादा आई बाबांना साथ द्यायला बसला. पाच-दहा मिनीटांनी पुन्हा बेल वाजली. मला काही ऐकू नाही आलं आतमध्ये कोण आहे ते. आई आली हसत आतमध्ये आणि लाडात म्हणाली “रोहित आलाय! तू सांगितलं नाहीस तुम्ही भेटलात ते!”. लगेच मूड बदलला?!  मला काय बोलावं ते कळेना… मी बाहेर गेले तर दादा त्याच्याशी टाळ्या देत गप्पा मारत होता. बाबा मला बघून म्हणाले, “ये! तुम्ही गप्पा मारा… मी श्रीखंड घेऊन येतो. रोहित जेवूनच जाईल”. “म्हणून तर सकाळी आलो” रोहित आगाऊपणा दाखवत बोलला. मी सोडून सगळे हसले. “अगं लाजतेस काय! ये! बस!” दादाला कधी काय बोलावं कळेल तर शप्पथ. मग मी रोहितच्या समोर जाऊन बसले. नजरेनेच त्याला विचारलं “घरी का?” , तो खांदे उडवत नजरेनेच म्हणाला “तुला भेटायला”.  तेव्हा का माहीत नाही मझ्या पोटात एकदम हलकासा गोळा आला…
आईने त्याला सरबत देत विचारलं “आई बाबा कसे आहेत? काय चाललं आहे तुझं सध्या? ”
“आई बाबा मस्तं मज्जेत. Retired life enjoy करत आहेत दोघेही. म्हणून परत आलो मुंबईला. आमचे आई-बाबा थोडे वेगळे आहेत. त्यांना पुणे- सातार्‍यापेक्षा मुंबई बरी वाटते retired life घालवण्यासाठी. मी नोकरी करतोय, आत्ता आहे मुंबईमध्ये पण काही भरोसा नाही पुन्हा कधी UK ला पाठवतील ते” आई अगदी कौतुकाने ऐकत होती.  “लग्न केलंस की नाही?” दादा परत पचकला. “नाही! वेळच नाही मिळाला.. प्रेमात पडायलाही आणि मुली बघायलाही… lets see.. next year maybe.”  आईने माझ्याकडे पाहीले. मला समजलं तिच्या डोक्यात काय चाललं आहे ते. त्यानंतर अशाच काही गप्पा झाल्या, जेवण झालं. आई बाबा रोहितला सोडतच नव्ह्ते. मला वाटलं की आता लग्नाची बोलणी करुनच सोडतील. मी त्रासलेल्या नजरेने बघितलं आईकडे. तिला बहूतेक माझी दया आली.
“अरे… आम्हीच काय गप्पा मारत बसलोय तुझ्याशी… तुम्ही गच्चीवर जा म्हणजे निवांत गप्पा मारता येतील. आमचा disturbance नको.”  आईला माझी दया नव्ह्ती आली.
आम्ही गपचूप गेलो गच्चीवर.
मी त्याला रागातचं विचारलं  “काय चाललंय तुझं? ”
तो साळ्सूदपणाचा आव आणत म्हणाला “अरे! बोललो ना मगाशी.. नोकरी कर..”.
मी एकदम ओरडले “घरी का आलास? मला न विचारता तेही!”
“मला भेटायचं होतं तुला, बोललो तेही खाली असताना”.
“लगेच घरी यायची गरज नव्ह्ती त्यासाठी. बाहेर पण भेटू शकलो असतो. बघितलं ना कसं वागत आहेत ते? जरा तरी विचार करायचा येण्याआधी…”
“केला विचार. पण sorry… असं काही अपेक्षीत नव्हतं. मी विचार केला होता की तुझे आई बाबा भेटतील पण असं स्वागत होईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. जसे पूर्वी मी आलो की आपण गच्चीवर येऊन गप्पा मारायचो तसे मारु, at the most घरच्यांशी थोडे updates share करून वर येऊ इतकाच विचार केला होता.”
“तेच ना! तू नेहेमी स्वत:चाच आणि स्वत:च्याच अनुशंगाने विचार करतो. दुसर्‍यांच्या दृष्टीने कधी विचार करणार.”
“I am sorry. हे इतकं awkward  होइल असं वाटलं नव्हत. पण ठीक आहे. आता तरी गप्पा मारुया?”
“नको. माझा मूड नाही. नंतर कधी मी तुला सांगते तेव्हा बोलू. आत्ता नीघ तू.”
“It’s not a big deal यार! समजवू आपण त्यांना की खयाली पुलाव नका बनवू”
“तुला नाही समजणार.”
“try?”
“आआह!! ते खूप desparate झाले आहेत माझं लग्नं करुन देण्यासाठी. वय उलटून गेलेल्या मुलीसाठी स्वत:हून आलेलं आयतं ’स्थळ’ ते सहजासहजी जाउ नाही देणार. आणि जर आत्ता जाउन तू बोललास की खयाली पुलाव नका बनवू तर त्यांना वाटेल की मी पढवलं तुला”
“ओह! चायला! complicated आहे की”
“नशीब. समजलं तुला ते”
“नाही… समजलं तर अजुनही नाही. Problem काय आहे? लग्नंच नाही करायचं की माझ्याशी नाही करायचं?”
“wha..?! तू अजून डोकं खाऊ नकोस आता… नीघ.. प्लीज!”
“कीती तो राग!!! मस्ती करतोय तुझी. चल. निघतो मी. Don’t worry. मी बोलतो त्यांच्याशी… तू इथेच थांब. Don’t argue. तुला कोणी एक अक्षरही बोलणार नाही नंतर.”
असं बोलून तो खाली गेला. काही वेळाने दादा वरती आला मला बोलवायला. आणि रोहितने सांगितल्याप्रमाणे कोणीच मला काही नाही बोललं.” कृतिका समोसा उचलत बोलली. तिला कळलच नाही बोलण्याच्या नादात समोसा कधी मागवला ते.
“बरं! मग आता problem काय आहे?”
“आई बाबा खूप विचित्र वागत आहेत. मला काही बोलत नाहीत लग्नाबद्दल… एकमेकांशीही नाही बोलत ह्यबाबतीत.  काय बोलला असेल तो त्यांना ? त्यानंतर रोहितने ना मला मेसेज केलाय ना फोन. मी त्याला करायचा विचार केला एक दोनदा ह्याबद्दल विचारायला. पण हिम्मत नाही झाली.. did I overreact? मी त्याला दुखावलं तर नाही ना… शी… काय त्रास आहे… सगळं मला हवं तसं आहे तरी मला त्रास होतोय. मी hopeless आहे”. समोश्याचा मोट्ठा घास घेत कृतिका म्हणाली.
“तूला actually काय हवंय हे आधी ठरव. डोकं शांत ठेवून.  मग दुसर्‍या गोष्टींचा विचार कर. तुझा राग आणि वैताग दोन्ही खूप उथळ आणि बालीश आहेत. तुलाही ते आतमध्ये कळून चुकलं आहे. त्यामुळे just forget and move on! .. anyway.. मला पळावं लागेल… खूपच वेळ गेला.. मला संध्याकाळी ठाण्याला जायचं आहे लग्नाला. आपण निघुया का?” माया सगळं आवरत म्हणाली.
“हो हो… निघुया.. thanks यार.. मला बोलून थोडं मोकळं वाटतंय…”
“cool…  उद्या मी फोन करते तुला. आपण अजुन बोलू ह्यावर हवं असेल तर.”
मायाला बाय बोलून ती रिक्षाची वाट बघू लागली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. रोहितचा होता.
“हेल्लो”
“अरे वा! मूड बरा दिसतोय आज.”
“हो…”
“छान. भेटतेस?”
“मी बोरीवलीला आहे”
“मी येउ शकतो तिथे १५ मिनिटांत.”
“…”
“काय? आहेस का?”
“ये… मी CCDकडे आहे.”
“आलोच. भेटू!”
तिने फोन ठेवला. उगीचंच केस सारखे केल्यासारखं काहीतरी केलं. मोबाइल दोन तीन वेळा unlock -lock केला. कारण नसताना. १५ मिनिटं ५ तासांसारखी वाटत होती. तो आला की काय बोलायचं ह्याची एक तालीम केली तिने मनातल्या मनात..काचेतुन तो येताना दिसला आणि तिच्या चेहेर्‍यावर मोठ्ठं स्मितहास्य उमटलं.

—-४—-

मग? काय ठरवलं?”
“काही नाही अजून!”
“एक महिना झाला ना? आता आठवडाच बाकी आहे”
“हो… आहे वेळ”
“अजून काही नाही ठरवता आलं… ७ दिवसात काही साक्षात्कार होणार आहे का? काय चाललंय तुझ्या मनात सांग तरी… काही मदत…”
“नकोय मला. नंतर बोलुया का? मी कामात आहे.”
“आम्हीच मुर्ख ना जे काळजी करतो तुझी? त्याची किंमत नाही तर किमान नीट बोलत तरी जा. आई आहे मी तुझी. तुम्हाला फक्तं तुमच्या clients शीच नीट बोलता येतं. आम्ही तुमचे ..काय म्हणतात ते… housekeepers आहोत ना…”
“आई please! अर्धा तास दे मला. नीट बोलूया मग. खुप urgent delivery आहे.”
कृतिका laptop वर facebook ची window बदलत बोलली. आईला दुसऱ्या बाजूने काही दिसत नव्ह्ते. आई कृतिकासमोर हात जोडून बाहेर गेली आणि तिने पुन्हा Facebook उघडले. खरतर तिला आईशी बोलायची खुप ईच्छा होती. पण आजकाल ती जे करावेसे वाटते त्याच्या नेमकं उलट करत होती. का हे तिचे तिलाही कळत नव्हते. पण काहीतरी विस्कटले आहे एवढे मात्र जाणवत होते. काहीतरी नेटवर बघता बघता तिने सहज google search केलं “how to decide”. बस. काय ठरवावे किंवा कसे करावे काही नाही. काहीतरी वाचायला चालू केले इतक्यात फोन वाजला. त्याचा होता. काही वेळ नुसता वाजू दिल्यावर तिने उचलला.
“Hi!!” कृतिका आवाजात खोटा उत्साह आणुन बोलली.
“Hi!! कामात आहेस का?”
“नाही. बोल ना”
“Guess what? I am back!”
“काय?!! का?”
“अरे? का काय! संपवलं काम लवकर तुला surprise द्यायला”
तिला काय बोलावं कळेना. डोकंच काम करेनासं झालं.
“आहेस ना?”
“आं… हो… अरे वा… बरय.”
“तुम्ही मुली ना प्रचंड unpredictable असता… मला वाटलं तुला आनंद होईल… असो… भेटशील का उद्या?”
तिला खरंतर नाही म्हणावसं वाटत होतं पण काही कारण सुचेना नाही म्हणण्यासाठी.
“बरं… कुठे?”
“Let’s continue from where we left last time. CCD?”
“चालेल. भेटूया मग”
फोन ठेवून ती डोक्याला हात लावुन बसली. विचार काहीही येत नव्हते डोक्यात… फक्तं त्यांची शेवटची भेट डोळ्यांसमोर रेंगाळत होती. ती किती उत्सुकतेने वाट बघत होती त्याची. सगळा राग, तक्रारी बाजुला ठेवून. तो दिसला तेव्हा तिच्या पोटात हलक्या गुदगुल्या झाल्या आणि तिला स्वत:चच हसू आलं. त्यांनी खूप गप्पा मारल्या… म्हणजे तो बोलत होता आणि ती ऐकत होती. पण तरीही तिला मनातलं सगळं सांगितल्यासारखं मोकळं वाटत होतं. ती बऱ्याच दिवसांनी खळखळून हसत होती. आणि अचानक तो म्हणाला…
“ एक सांगू?”
“सांग ना! तसं तर मगापासून तुच सांगत आहेस!” ती मिस्कीलपणे बोलली.
“हा! हे जरा वेगळं आहे…secret.. आठवतंय मी तुला त्यादिवशी बोललो होतो की मी तुझ्या घरच्यांना समजावेन आणि त्यानंतर कोणीही तुला छळणार नाही?”
“हो. आणि तू त्यांना काय गोळी दिली माहित नाही पण अक्षरश: कोणीही एकदाही शब्द नाही काढला लग्नाबद्द्ल…काय बोलला तू त्यांना?”
“मी त्यांना सांगितलं की माझी इच्छा आहे तुझ्याशी लग्न करण्याची. मी खूप वर्षं वाया घालावली तुझ्यापासून दूर राहून. जेव्हा तू परत दिसलीस त्या दिवशी तेव्हापासुन मी फ़क्त तुझाच विचार करत आहे. And then I realized.. मी तुझा विचार करणं कधी बंदच केलं नव्हतं…”
कृतिका ऐकता ऐकता विचारांत हरवली… विचार करणं बंद नव्हतं केलं तर बोलणं का कमी केलं? लग्न करायचं आहे माझ्याशी? मला इतकं गृहीत धरलं की घरी येउन विचारेल आणि मी हो म्हणेन?
“ऐकत आहेस ना? बोल ना काहीतरी… तुला राग आला का परत?”
“sorry… काय म्हणालास?”
“मी म्हणालो की तू विचार कर ह्यावर.. काही घाई नाही. मी पुढल्या सोमवारी UK ला जातोय. एक-दिड महिन्यानी परत येइन. I hope you will have an answer by then?”
तिला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता… तो इतकं बोलुन गेला आणि आपल्याला ऐकूही नाही आलं? आणि परत जाणार? कशाच्या आधारावर ठरवायचं की ह्यच्याशी लग्नं करायचं की नाही! दहा-पंधरा वर्षांत तोही बदलाला आहे मी पण… त्याला जाणुनही नाही घ्यावसंं वाटत की काय झालं माझ्याबरोबर किंवा मी किती बदलली आहे ते…
“मला वाटतं आपण थोडं बोलायला हवं काहीही ठरवण्या आधी. पंधरा वर्षांपुर्वीचे आपण आणि आजच्या आपल्यांत खूप फरक आहे. लग्न केल्यावर तू बदलली किंवा बदलला आहेस बोलण्यात अर्थ नाही. एकमेकांना जाणुन मग ठरवू काय ते.”
“Makes sense! पण माझं ठरलय. तू ठरव तुला जे हवं ते. आपण skype वर बोलू जेव्हा मी नसेन इथे तेव्हा.”
“तुला माझ्याबद्दल जाणुन नाही घ्यायचं?”
तो हलकंच हसला आणि तिचा हात धरुन म्हणाला “मी तुला नीट ओळखतो. तू अजुनही तशीच आहेस…फ़क्तं तू स्वत:वर खुप अत्याचार करायला लागली आहेस.”
तिला कळेना काय बोलावे! एकीकडे तिला त्याला उलट काहीतरी बोलायचे होते पण दुसरीकडे मन मात्र अगदी त्याच्या शब्दांना दुजोरा देत होते.
आत्ताही ती भेट आठवताना तिची अवस्था तशीच झाली होती. वास्तविक तिला स्वत:चाच कंटाळा आला होता.
का मी सगळ्या गोष्टींना इतकी ताणते? का मला सरळ वागता येत नाही… मला जर तो आवडतो तर मी सरळ त्याला होकार का नाही देत… इतका का ego मला… का कडवटपणा… तो एकच वाक्य बोलला माझ्याबद्दल! इतकं सोपं आहे माझा स्वभाव ओळखणं? पण खरंच बोलला ना तो… मी त्रासच देतेय की स्वत:ला… देत आले आहे एवढी वर्षे. आणि खापर मात्रं इतरांच्या नावावर फोडलं. कधी दादा कधी आई कधी तो… मला किती जपतात सगळे आणि मी मात्र सगळे मला छळायलाच बसले आहेत अशी react होते! मी घाबरत का आहे होकार द्यायला.. मला असं का वाटतं की माझा असा स्वभाव मला पुढेही त्रास देइल… मी बदलू शकेन का… मला बदलायला हवं जर मला …
अचानक ती विचारांमधून बाहेर आली. तिने पाणावलेले डोळे पुसले… उठून चेहरा धुतला आणि काही वेळ स्वत:ला आरशात निरखत बसली.
“sorry” स्वत:कडे पाहुन ती ओल्या डोळ्यांनी मनापासून म्हणाली.
“It’s ok” डोळे पुसत ती स्वत:लाच म्हणाली आणि हलकेच हसली.
इतक्यात फोन वाजला… त्याचा होता… तिने लगेच उचलला..
“मला रहावलं नाही… रागावू नकोस… मी गच्चीवर आहे तुझ्या…”
“आलेच!” गालातलं हसू दाबत आरशात पहात ती म्हणाली.
आणि गेल्या कित्येक वर्षांत न घडलेली तिची सुखद भेट झाली… अंगावरच्या हलक्या शहार्‍याशी… स्वत:च्याच लाघवीपणाशी….स्वत:शी….

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s